ब्रेकिंग न्यूज

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग बदलण्याच्या विरोधात समृद्धी महामार्गावर चक्कजाम

Share

नाशिक- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने हा मार्ग आता वादात सापडला आहे. या निर्णयाविरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी आंदोलन केले तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाराजी आहे. नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा, अहिल्यानगर-चाकण या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केलंय. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे.

केंद्र सरकार नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे नारायणगावाचा जागतिक दर्जाचा कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ दुर्बीण समूह धोक्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे रेल्वे प्रकल्पाचा विरोध केला जात आहे. या विरोधामुळे या मार्गात बदल किंवा भूमिगत मार्गाची आखणी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासासाठी अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचसोबत समितीत रेल्वे बोर्डाचे विवेक गुप्ता, पुणे, नाशिक विभागाचे आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार

या चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले आहेत. मूळ रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने अहिल्यानगरकरांनी कडाकडून विरोध दर्शवला आहे. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू असून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलन सुरु असताना सत्यजित तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. मूळ मार्ग कायम ठेवावा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली असता महाजन म्हणाले की, नक्कीच याचा विचार होईल. या प्रश्नासाठी कमिटी नेमण्यात आली आहे. ६० दिवसांच्या आत निकाल द्यायचा आहे. त्यावर सत्यजित तांबे यांनी मागणी केली की कमिटीने तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा विचार केला पाहिजे.

याचवेळी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले “काल रात्री मला सीएम साहेबांचा फोन आला होता. त्यांनीही आश्वासन दिले आहे.” मात्र हे आंदोलन जनभावना पोहचण्यासाठी असल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.