ब्रेकिंग न्यूज

कोंढव्यात हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन सिलेंडरने घेतला पेट, दोन कामगार जखमी

Share

पुणे – गॅस टाकीच्या पाईपमधून गळती होऊन सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याची घटना कोंढवा बुद्रुक येथील हॉटेल गोकुळमध्ये गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत दोन कामगार जखमी झाले. आग लागल्यानंतर हॉटेलमधील ग्राहकांनी तात्काळ बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

आतिफ खान (वय-४०) आणि छाया (वय-४०) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणून धोका दूर केला. दरम्यान, बेसमेंटमध्ये एक व्यक्ती अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या गॅस टाकीच्या पाईपला गळती झाली. त्यातून गॅस बाहेर पडून आग लागली. किचनमध्ये आठ रिकामे आणि दोन भरलेले सिलेंडर होते. आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील ग्राहक बाहेर पडले.

या घटनेत एक महिला आणि काही पुरुष किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी दोन जखमींना रुग्णालयात दाखल केले.