पिंपरी- भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची विक्री पिंपरीतील दुकानातून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने क्रीम जप्त केल्या आहेत. पिंपरीच्या रिव्हर रोडवर एका कॉस्मेटिक दुकानात ही क्रीम आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिव्हर रोडवरील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स दुकानात ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद असलेल्या आणि भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या बनावट गोरी ब्यूटी क्रीमची विक्री होत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार एटीबीच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या मदतीने दुकानात कारवाई केली.
या कारवाईत प्रत्येकी ५५० रुपये किमतीच्या २३ क्रीम आढळून आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत १२ हजार ६५० रुपये आहे. याप्रकरणी विक्रेता प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘गोरी ब्यूटी क्रीम’च्या भारतातील कंपनीचे अधिकृत तपासणी अधिकारी रईसोदीन इनामदार यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत केणे तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने पिंपरी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
