पुणे- थेट पोलीस हवालदारालाच धमकी देऊन धक्काबुक्की करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला. हा प्रकार शनिवारवाड्याजवळ शनिवारी दि. २५ रोजी घडला. या प्रकरणी संबंधित डिलिव्हरी बॉयच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आर्यन सावंत असे या आरोपी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी तो शनिवारवाडा परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्याचा एका महिलेशी वाद झाला. वादातून त्याने महिलेला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कसबा पेठ पोलीस चौकीतील हवालदार वैभव येसादे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी आर्यन याने थेट येसादे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर ‘मी आताच जेलमधून बाहेर आलोय,’ अशी धमकीही त्याने हवालदार येसादे यांना दिली. वैभव येसादे यांनी तातडीने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आर्यन सावंतविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी पुढील तपास करत आहेत.
