रात्रीच्या अंधारात पाठलाग करून कारमधून २५० किलो गांजा जप्त ; शिरूर येथे गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई

रात्रीच्या अंधारात पाठलाग करून कारमधून २५० किलो गांजा जप्त ; शिरूर येथे गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई
Share

पुणे – अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. लोणी काळभोर ते शिरूर असा सुमारे ८० किलोमीटर पाठलाग करून २५० किलो गांजासह १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोळवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक पांढरी महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कार संशयास्पदरीत्या वेगात जाताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी हाताने इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोलापूरच्या दिशेने वेगाने पळ काढला. पथकाने सुमारे तीन तास पाठलाग करून यवत, काष्टी मार्गे गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी परिसरात या वाहनाला घेराव घालून ताब्यात घेतले.

झडती घेतली असता पोलिसांनी कारमधून १ कोटी २५ लाख रुपये किमतीचा २५० किलो गांजा, २५ लाख रुपये किमतीची महिंद्रा XUV 700 कार आणि १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरासह परिसरात अंमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने ही कारवाई केली.

Vedh News