विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या ५५ वर्षाच्या महिलेला वारजे येथून अटक

पुणे – विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या ५५ वर्षाच्या महिलेला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिच्याकडून २९ हजार ६०० रुपये किमतीचा ५९२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई वारजे येथील अमर भारत सोसायटी परिसरात करण्यात आली.
सुनीता सिकंदर भाट (वय ५५, रा. अमर भारत सोसायटी, वारजे) असे या महिलेचे नाव आहे. यापूर्वीही तिच्यावर अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक वारजे आणि नांदेड सिटी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अमर भारत सोसायटी परिसरात एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस कर्मचारी तुषार किंद्रे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा लावला आणि महिलेला ताब्यात घेतले.
तिच्याकडून २९ हजार ६०० रुपये किमतीचा ५९२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







