मातृभाषेवरील आक्रमण थांबवले तरच हिंदू संस्कृती टिकेल, अभिनेते शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन

मातृभाषेवरील आक्रमण थांबवले तरच हिंदू संस्कृती टिकेल, अभिनेते शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन
Share

पुणे- जगातील सर्व राष्ट्र भारताची हिंदू संस्कृती संपवण्यासाठी एक झाले आहेत. हिंदू संस्कृती संपवायची असेल तर प्रथम येथील भाषेवर आक्रमण केले की हिंदू संस्कृती सहज संपेल हे त्यांनी जाणले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली मातृभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या पुढच्या पिढीला मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे अन्यथा हिंदू संस्कृतीचा अस्त होऊ शकतो असे प्रतिपादन अभिनेते आणि सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी केले.

आध्यात्मिक विचारवंत हेमंत बापट यांनी लिहिलेल्या ‘महामृत्युंजय मंत्र व मंत्र रहस्य’ या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी आवृत्ती तसेच ‘कर्मा अँड डेस्टिनी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पोंक्षे बोलत होते. यावेळी सद्गुरू गाणगापूर निवासी यती वल्लभानंद सरस्वती, अभिनेते नितीश भारद्वाज उपस्थित होते.

पोंक्षे पुढे म्हणाले की, आजच्या काळामध्ये अशा पुस्तकांची गरज आहे. कारण हिंदू धर्म म्हणजे काय हे पुढील पिढीला समजले पाहिजे. हजारो वर्षांपासून या देशावर अनेकांनी आक्रमण केले. हे सगळे हल्ले यशस्वीपणे परतवून आजही हिंदू धर्म टिकून आहे. म्हणूनच आज अशी पुस्तके लिहिली जातात. त्याचे प्रकाशन होऊ शकते. मात्र आता थेट लढाई न करता आक्रमणकर्ते सर्वात अगोदर तुमच्या मातृभाषेवर आक्रमण करीत आहेत. एकदा मातृभाषा संपली की तुमची संस्कृती लयाला जाण्यास वेळ लागणार नाही हे आक्रमण करणारे जाणून आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर करावा, येणाऱ्या पिढीला मातृभाषेचे महत्व पटवून द्यावे. त्यांना मराठीमधून शिक्षण घेण्याची सक्ती करावी तरच आपली हिंदू संस्कृती पुढील कित्येक वर्षे ताठ अभिमानाने टिकून राहील.

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नशीब आणि प्रारब्ध यामधील फरक विशद करून सांगितला. नशिबात जे असेल ते स्वीकारून त्याविरुद्ध प्रत्येकाने लढले पाहिजे असे ते म्हणाले.

हेमंत बापट यांनी आपल्या प्रास्ताविकात मनुष्य जीवनावर परिणाम करणारी ही पुस्तके असून या पुस्तकामुळे आध्यात्मिक सकारात्मक जीवन कसे जगावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगितले. कर्म आणि प्रारब्ध हे पुस्तक भगवद्गीतेतील वचनांना अनुसरून सद्य जीवन कसे जगले पाहिजे याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. खांडेकर यांनी केले. तर आभार श्री. खांडेकर यांनी मानले.

Vedh News