बिल्डरच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या बारामती पोलिसांनी ८ तासात आवळल्या मुसक्या

बिल्डरच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या बारामती पोलिसांनी ८ तासात आवळल्या मुसक्या
Share

बारामती – बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर गोळीबार केल्याची घटना शनिवारी (दि. २१) संध्याकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करून आठ तासांत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजन धनंजय कोळेकर (वय 35, रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंड्या उर्फ अक्षय काळे व त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या डिफेन्डर गाडीवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच तपास पथके रवाना केली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या आठ तासात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत.

या गोळीबाराच्या गुन्ह्यात बंड्या उर्फ अक्षय काळे याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत. बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे खंडणीसाठी गोळीबार करणाऱ्या आरोपींचा आठ तासांत शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

Vedh News