पुणे महापालिकेच्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेत लसीकरणापासून वंचित बालकांसाठी आजपासून घरोघरी आरोग्य पथके

पुणे – शहरात रविवारी (दि. २२) राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. निर्धारित उद्दिष्टाच्या ९०.२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना आज, सोमवारपासून (ता. २३) आरोग्य पथकांकडून घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात पाच वर्षांखालील ३ लाख १६ हजार २७५ बालकांना डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या मोहिमेसाठी महापालिकेने चार लाख पोलिओ लसींचा साठा उपलब्ध करून घेतला होता. शहरात १ हजार ३६७ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील बालकांना त्यांच्या पूर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत पोलिओ डोस देण्यात आला. त्याचबरोबर प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी ट्रान्झिट टीम आणि नियमित बूथवर पोहोचू न शकणाऱ्या बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्वारगेट येथील कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रान्झिट पोलिओ बूथला भेट देऊन लसीकरण मोहिमेच्या कामकाजाची पाहणी केली.
या मोहिमेत अद्याप पोलिओ डोस न घेतलेल्या बालकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पाच वर्षांखालील बालकांचे लसीकरण करणार आहेत. त्यामुळे पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकांचे लसीकरण करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.







