पुण्यात विमानतळ रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एकाला अटक

पुण्यात विमानतळ रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एकाला अटक
Share

पुणे – पुणे-नगर रस्त्यावरील विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना मारहाण करून लुटल्याच्या घटना समोर येत होत्या. अखेर या टोळीतील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. 

रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

९ नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली होती. यात चोरट्यांनी एका तरुणाला अडवून मारहाण केली होती. मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडील मोबाइल, सोन्याची अंगठी आणि २९ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला होता.

संबंधित तरुणाने पोलिसात धाव घेत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, या लूटमार प्रकरणाचा तपास करताना येरवडा पोलिसांनी परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्याआधारे आरोपी रेहान अश्रफ शेख याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. टोळीतील इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Vedh News