कोंढव्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून १८ वाहने भस्मसात

पुणे – कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरातील एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये पहाटे भीषण आग लागली. या आगीत १६ दुचाकी, एक तीनचाकी आणि एका चारचाकी वाहनासह एकूण १८ वाहने जळून खाक झाली.
ही घटना आज, रविवारी (दि. २२) पहाटे ३ वाजून १९ मिनिटांनी लेन क्रमांक ३४, भाग्योदयनगर, कोंढवा येथे घडली. आगीमुळे इमारतीतील लिफ्ट आणि इलेक्ट्रिक वायरिंगचेही मोठे नुकसान झाले.
इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्राची तीन वाहने घटनास्थळी रवाना झाली.
जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीने रौद्ररूप धारण केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. श्वसन यंत्र परिधान करून जवानांनी धुरातून पार्किंगमध्ये प्रवेश केला आणि पाण्याचा मारा सुरू केला.
जवानांनी सर्वप्रथम इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. सुमारे ३५ रहिवाशांना गच्चीवर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आग शेजारील इमारतीत पसरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. जवानांनी अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत पार्किंगमधील १६ दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
या बचावकार्यामध्ये वाहनचालक राहुल जाधव, राहुल मखरे तसेच अग्निशमन जवान सागर दळवी, रितेश मोरे, शैलेश दवणे, अभिजित थळकर, तेजस खरिवले, राहुल दळवी, संतोष माने, प्रसाद शिंदे, सूरज माळवदकर, अक्षय चव्हाण आणि अभिषेक कसबे यांनी सहभाग घेतला.







