ब्रेकिंग न्यूज

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

Share

पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या दास मॅडम होत्या.

प्रीती नारायण यांना यांना आयटी क्षेत्रातील २२ वर्षांचा अनुभव असून, त्या सध्या TCS च्या AI Centre of Excellence (AI CoE) मध्ये Go-To-Market Leader म्हणून कार्यरत आहेत.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रीती नारायण म्हणाल्या की, “आपल्यामध्ये गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू देऊ नका. कोणत्याही अडचणीमुळे आपल्या आत्मविश्वासाला किंवा स्वप्नांना मागे पडू देऊ नका. चिकाटीने आणि सातत्याने प्रयत्न करत प्रत्येक अडचणीवर मात करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करा.”

विद्या दास या गेल्या २० वर्षांपासून फायनान्स क्षेत्रात कार्यरत असून, सध्या VOIS येथे फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, गरजू व योग्य मुलींची निवड करण्यासाठी संस्थेने आखलेल्या नियमावलीचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत एका गरजू मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.

आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने पुढे येऊन मदत करावी. उर्वरित गरजू मुलींच्या शिक्षणासाठीही समाजाने हातभार लावावा असे आवाहन ओम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या महाजन ,डॉ. सोनल पाटील आणि अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा सावंत यांनी केले.