धक्कादायक ! पोलीस चौकशीपूर्वीच राणा सूर्यवंशी रुग्णालयातून गायब

पुणे- बारामती विमानतळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेले उद्योजक राणा सूर्यवंशी रुग्णालयातून फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. पोलीस चौकशी होण्यापूर्वीच राणा सूर्यवंशी फरार झाल्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
१८ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळाजवळ आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी यांनी बारामती पोलिसांकडे दिली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या राणा सूर्यवंशी यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या हल्ल्यासाठी आरोपीना २ लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असतानाच राणा सूर्यवंशी रुग्णालयातून गायब झाल्यामुळे या प्रकरणातील तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.
राणा सूर्यवंशी हे पुण्याच्या रूबी रुग्णालयातून फरार का झाले, याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस चौकशीपूर्वीच ते फरार झाले आहेत. राणा सूर्यवंशी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली आहे. दरम्यान, राणा यांनी स्वतःवरील हल्ल्याचा बनाव रचला होता का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडविण्यात आला होता का? या शक्यतेचाही तपासाच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याची माहिती आहे. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एकूणच बारामतीतील हे हल्ला प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.






