ब्रेकिंग न्यूज

पुण्याच्या येरवडा भागात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक तर दोन महिलांची सुटका

Share

पुणे- पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिलांकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी हॉटेलमधून ऑनलाईन पद्धतीने हे सेक्स रॅकेट सुरु होते. येरवडा पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

राज राजेशाम सविता आणि सुनील शिवाजी शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येरवडा परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी हे रॅकेट उध्वस्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी फोनवरून आणि ऑनलाईन बुकिंग घेऊन ग्राहकांना शोधण्याचे काम करीत असता. त्यानंतर या ग्राहकांकडून मोठ्या रकमेच्या बदल्यात पीडित महिलांना जाळ्यात ओढून त्यांना जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.