पुणे- लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असून ते मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणस्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी दिली आहे.
पुण्यात झालेल्या ‘छात्रों क गूंज’ कार्यक्रमात निशा साबळे या विद्यार्थिनीने लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि वसतिगृहाच्या समस्या मांडल्या होत्या. तसेच मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मांजरी येथे यावे अशीही विनंती राहुल गांधी यांना केली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार राहुल गांधी मांजरी येथे जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी दिली आहे. शहर काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या आंदोलनात तात्काळ हस्तक्षेप करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.आपल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी दहा दिवसांहून अधिक काळापासून उपोषणावर आहेत. पुण्यामध्ये त्यांनी मला अशा नियमांबद्दल सांगितले, जे त्यांचा सन्मान हिरावून घेतात आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग रोखतात. हे विद्यार्थी कोणतीही खैरात मागत नाहीत. ते आपला हक्क मागत आहेत. सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी त्यांना आपल्या आरोग्याला धोक्यात घालण्याची वेळ येऊ नये. म्हणूनच, मी आपणास विनंती करतो की आपण आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटावे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण करावे.
