वाकड – येथील भुजबळ चौक परिसरात डॉलफिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून एका तरुणाने कार्यालयातील सामानाची तोडफोड करून कार्यालय चालवायचे असेल तर दर महिन्याला ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कार्तिक हनुमंत बारवे (वय २३, रा. सोळा नंबर कॉलनी क्रमांक १, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विकास काळे (वय २८, रा. म्हातोबा नगर, सम्राट चौक, वाकड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील डॉलफिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आरोपीने प्रवेश केला. त्याने कार्यालयातील दोन्ही संगणक, प्रिंटर, वायफाय मशीन आणि कॅमेरा डिव्हाइसची तोडफोड केली. तसेच फिर्यादीच्या हातातील दोन्ही मोबाईल फोडले. कार्यालयाचा फ्लोअर आणि टेबलचेही नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी आरोपीने फिर्यादीला भीती दाखवून इजा करण्याची धमकी दिली. तसेच दर महिन्याला ५० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करून, पैसे न दिल्यास कार्यालय चालू देणार नाही असे सांगितले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक सोनुने करीत आहेत.
