ब्रेकिंग न्यूज

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा घेण्याचा लोकसेवा आयोगाचा निर्णय 

Share

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काढला आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

२२ मार्च २६ रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेचा निकल दिनांक १२ जून, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. परीक्षेनंतर ५०६ उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरले.

यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.

परंतु, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २२ ते २६ जुलै २०२६ दरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार करून परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी पेपर फुटल्याचा दावा केला.

तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘एमपीएससी’ने २७ जुलै २०२६ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास करून एका उमेदवाराला प्रश्नसंच आधीच मिळाल्याचे आणि त्याला याचा थेट फायदा झाल्याचे अहवालात नमूद केले.

त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.