ब्रेकिंग न्यूज

आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी एअरहोस्टेस सह एकाला अटक

Share

मुंबई- गुजरातच्या वडोदरा येथून मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअरहोस्टेसला तिच्या साथीदारासह सूरत क्राईम ब्रँचने अटक केली आहे. वडोदराहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

मानसी सय्यद (वय ४१) आणि सोहेल सुलेमान शेख (वय २०) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील रहिवासी आहेत.

वडोदराहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सूरत गुन्हे शाखेने दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कारवाई करून 30 लाख रुपयांच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी मुंबईतून एक कार भाड्याने घेतली आणि ते वडोदरा येथे गेले. वडोदरा रेल्वे स्टेशनजवळ एका अज्ञात महिलेकडून त्यांनी ड्रग्जची ही खेप घेतली. हे ड्रग्ज मुंबईत आणल्यानंतर त्याचे ५ ते १० ग्रॅमचे लहान पॅकेट्स बनवून ग्राहकांच्या मागणीनुसार ते सांताक्रूझ आणि मुंबईतील इतर भागात विकण्याची त्यांची योजना होती. तपासादरम्यान समोर आले आहे की, ड्रग्ज लपवण्यासाठी आणि पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी मुलांच्या डायपर्सचा वापर केला होता.

मानसी सय्यद २०१५ पासून ड्रग्जचे सेवन करत होती आणि नंतर ती स्वतः तस्करीत सामील झाली. यापूर्वी २०२१ मध्ये देखील इंदूर गुन्हे शाखेने तिला १०० ग्रॅम मेफेड्रोनसह अटक केली होती, ज्यासाठी तिने ४ वर्षे तुरुंगात घालवली आहेत.