ब्रेकिंग न्यूज

महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार

Share

पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राहुल गांधी महिलांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही स्वत:शिवाय कोणालाही बांधील नाही. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे” मात्र तरीही त्यांना विशिष्ट चौकटीत बसवलं जात असल्याची खंत राहुल यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘देशात ७० कोटी पुरुषही आहेत. मग ७० कोटी महिलाच महत्त्वाच्या का वाटतात? यामागचा तर्क काय? असा प्रश्न पडू शकतो. त्याला माझं उत्तर आहे की महिला नैसर्गिकरित्या अधिक संवेदनशील असतात. त्यांना पुरुषांच्या तुलनेत अधिक सहानुभूती असते. त्यामुळे महिला वर्ग, मग त्या तरुणी असोत वा वृद्ध असोत, त्या भारताचं सामर्थ्य आहेत,’ असं राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधींनी महिलांवरील अत्याचारांचे आकडेच वाचून दाखवले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचं त्यांनी आकडेवारीतून सांगितलं.

यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या युवतीनी आपले अनुभव कथन केले आणि आपले विचार मांडले.

राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम आरटीओ’जवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती.