पुणे – पुण्यात मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी २४ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे यांचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. याप्रकरणी पती राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू, सासरे व नणंदेसह ११ जणांवर गुन्हे दाखल होऊन आरोपपत्र दाखल झाले. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणातील महत्वाची घडामोड म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी बंडू फाटक मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार राजेंद्र हगवणे याला पवना डॅमच्या फार्महाऊसवर आसरा दिल्याचा आरोप बंडू फाटक यांच्यावर होता. पुणे सत्र न्यायालयाने बंडू फाटक यांची या खटल्यातून डिस्चार्ज करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर बंडू फाटक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
आरोपीला जेवण देणे किंवा राहाण्याची जागा देणे म्हणजे ‘Harbouring’ चा गुन्हा ठरत नाही असा युक्तीवाद बंडू फाटक यांचे वकील प्रशांत पाटील यांनी केला होता. गुन्ह्याची माहिती असणे आणि आरोपीला लपवण्याचा हेतू याची माहिती आवश्यक असल्याची हायकोर्टात सुनावणी दरम्यान मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर हायकोर्टाने बंडू फाटक यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 22 मे 2025 रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. वैष्णवी हगवणे हीने सासरच्या हुंड्याच्या मागणीमुळे सासरच्या जाचाला कंठाळुन जीवन संपवल्याने हे प्रकरण प्रचंड गाजले होते.
