पुणे- पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ ही नंबरप्लेट आता लवकरच बदलण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनांना देण्यात येणाऱ्या ‘एमएच-१२’ नोंदणी क्रमांकांची दोन अक्षरी मालिका संपत आल्याने पुण्यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन नोंदणी मालिका देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे आरटीओ अंतर्गत सुरू असलेली ‘एमएच-१२’ (MH-12) ही दोन अक्षरी नोंदणी मालिका (सध्याची शेवटची ‘ZZ’ मालिका) अवघ्या दोन दिवसांत संपुष्टात येत आहे. ‘एमएच-१२’ची मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेत तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
आरटीओने ‘MH-12 1A’ (एक अंक + एक इंग्रजी अक्षर) हा देशातील पहिला आगळावेगळा अल्फान्यूमेरिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र, या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मसुदा प्रसिद्ध करणे, हरकती मागवणे आणि ‘वाहन’ सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बदल करणे यासाठी किमान २ ते ३ महिन्यांचा अवधी लागणार आहे. मात्र नोंदणी ठप्प होऊ नये म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून ‘एमएच-६१’ निवडण्यात आला आहे.
‘एमएच-१२’ची मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेत तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पुणे आरटीओने वेगवेगळे पर्याय असलेले प्रस्ताव दिले होते. त्यामध्ये दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. ‘एमएच-१२-एएए-१२३४’ अशा स्वरूपाचा क्रमांक देण्याचा विचार होता. मात्र, क्रमांकाची लांबी वाढल्यास सीसीटीव्ही आणि स्वयंचलित नंबरप्लेट ओळख प्रणालींना तो स्पष्टपणे टिपण्यात अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.
ज्यांच्याकडे आधीपासून ‘एमएच-१२’ क्रमांकाची वाहने आहेत, त्यांच्या नंबर प्लेटमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र ‘MH-61’ अंतर्गत नोंदणी झालेल्या नवीन वाहनांना, भविष्यात केंद्राकडून ‘MH-12 1A’ मालिका अधिकृतपणे लागू झाल्यानंतर, निर्धारित शुल्क भरून नव्या ‘एमएच-१२’ मालिकेत हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.
