ब्रेकिंग न्यूज

पैंजण विकत घेण्याच्या बहाण्याने आले आणि ७ पैंजण चोरुन नेले, ५ जणांची टोळी जेरबंद

Share

पुणे – चांदीची मोड देऊन पैंजण विकत घेण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांनीसराफाची नजर चुकवून ७ पैंजण चोरुन नेले. या प्रकरणी ५ जणांच्या टोळीला लोहगाव पोलिसांनी गजाआड केले आहे.

कल्पना अंकुश कांबळे (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर), पांडुरंग राम गायकवाड (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी), दिक्षा वसंत शेलार (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी), सुमन बाबासाहेब कोरके (वय ६२, रा. गोसावी वस्ती, हडपसर), उत्तम बाबासाहेब कोरके (वय ४५, रा. मारळगाव, शहाडगाव (कल्याण, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पंकज चंद्रकांत तामखडे (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव वाघोली रोडवर त्यांचे श्री विश्वनाथ ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दुकानात २ महिला व एक पुरुष आले. त्याचवेळी एक महिला व एक पुरुष दुकानाच्या बाहेर कारमध्ये बसुन होते. दुकानात आलेल्या चोरट्यांनी चांदीची मोड दाखवुन त्याचे किती पैसे होतील, असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी जुन्या मोडीचे ६ हजार रुपये होतील, असे सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला पायातील पैंजण घ्यायचे आहे. त्यांनी दुकानाचे काऊंटरमधील डबा काढून त्यातील ८९ चांदीचे पैंजणाचे जोड त्यांना दाखविले. तेव्हा ते पैंजण पहात असताना त्यातील एका महिलेने पैंजणाचा डबा खाली पाडला. त्यानंतर ते डब्यामधील पैंजण परत डब्यामध्ये भरले. त्यानंतर त्यांनी आम्ही कॅश पैसे घेऊन येतो, आमच्या जवळ सध्या पैसे नाहीत, असे बोलून ते दुकानातून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी डब्यामधील पैंजण मोजून ठेवत असताना त्यांच्या लक्षात आले की, डब्यामधील ८९ पैंजणाचे जोड पैकी ७ पैंजण जोड गायब आहेत. त्यांनी दुकानामधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले पण त्यात काही मिळून आले नाही़ चोरट्यांनी ४२० ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपयांचे पैंजण चोरुन नेले होते.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शैलेश कुदळे, दादासाहेब बर्डे यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता त्यांना खबऱ्याकडून बातमी मिळाली की, हा गुन्हा कल्पना कांबळे व तिच्या साथीदारांनी केला आहे. त्यावरुन पोलिसांनी पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून चोरलेले पैंजण व कार असा अडीच लाखांचा माल जप्त केला आहे.