सिंधुताई सपकाळ यांच्या दत्तक मुलावर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

अमरावती – सुप्रसिद्ध समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या दत्तक मुलाविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
दत्तक घेतलेला मुलगा अरुण सपकाळ असे त्याचे नाव आहे. या बातमीमुळे सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील एका अल्पवयीन मुलीने कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप अरुण सपकाळ यांच्यावर केला आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम ७८, ७९, ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ६ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले असून, घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.






