पुणे – कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुण्यात रंगणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार हेमा मालिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, शर्वरी जेमिनीस यांची गणेशवंदना, २० देशांतील विद्यार्थ्यांचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ आविष्कार, महिला क्रिकेटपटूंचा ‘चक दे इंडिया’, व्ही. शांताराम यांच्या स्मरणार्थ ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘वंदे मातरम्’वरील विशेष सादरीकरण आकर्षण ठरेल. श्रींची प्रतिष्ठापना १४ सप्टेंबरला पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते होईल. महोत्सवादरम्यान ‘अंधमुक्त पुणे’ उपक्रमांतर्गत नेत्रदान नोंदणी कक्ष उभारले जाणार आहेत.
यंदाचा महोत्सव संस्थापक-अध्यक्ष स्व. सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. यंदापासून सुरू होणारा ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान केला जाईल. ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्ष अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी अगरवाल यांना ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
सुफी संगीत, केरळ महोत्सव, हिंदी हास्य कवी संमेलन, अशोक हांडे प्रस्तुत मराठी बाणा आणि हास्यजत्रा हे प्रमुख कार्यक्रम असतील. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम, बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शने, क्रीडा स्पर्धा ही देखील पुणे फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये असतील.
सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहेत.
पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सरचिटणीस डॉ. सतीश देसाई आणि पर्यटन विभागाचे प्रकल्पाधिकारी मयूर नांद्रे उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हल लोगोचे अनावरण कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
