ब्रेकिंग न्यूज

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

Share

मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी सभागृहात त्यांच्या पदमुक्तीची कायदेशीर घोषणा केली जाणार आहे.

पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. 20 ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र छाननी समितीने निर्णय देत ते अवैध ठरवले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी याबाबतची माहिती राज्य सरकारला दिली होती आणि राजपत्र काढण्याची विनंती केली होती. या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या. हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव होता. विशाखा राऊत या शिवसेना ठाकरे गटाच्या अनुभवी, ज्येष्ठ नगरसेविका होत्या. त्यांनी मुंबई शहराचे महापौरपदही भूषवले होते. आक्रमक, अभ्यासू, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान, सदा सरवणकर यांच्या दोन्ही मुलांचा 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता, त्यामुळे आता त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांना संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.