ब्रेकिंग न्यूज

मशागतीचे काम करत असताना शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू, उरळी कांचन मधील दुर्दैवी घटना

Share

पुणे- शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वळती, ता. हवेली येथे घडली आहे.

सोपान केरू कुंजीर (वय-५६ वर्ष, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ०४) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करत असताना हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कुंजीर हे शुक्रवारी सकाळी आपल्या स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने शेतात मशागतीचे काम करत होते. मशागत करत असताना अचानक ट्रॅक्टरचा तोल गेला आणि तालीवरून ट्रॅक्टर थेट शेतात उलटला. ट्रॅक्टर उलटल्याने सोपान कुंजीर हे त्याच्याखाली गंभीररीत्या दाबले गेले.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आदेश रोहिदास कुंजीर, चुलत भाऊ जितेंद्र दत्तात्रय कुंजीर व स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून सोपान कुंजीर यांना ट्रॅक्टरखालून बाहेर काढले. अपघातात सोपान कुंजीर यांच्या डोक्याला आणि हाताला अत्यंत गंभीर मार लागला होता. नातेवाइकांनी त्यांना तात्काळ स्वतःच्या चारचाकी वाहनातून उपचारासाठी श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, उरुळी कांचन येथे हलवले. मात्र,डॉक्टरानी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.