ब्रेकिंग न्यूज

उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतची बैठक निष्फळ, हिंजवडी आयटी कर्मचारी रविवारी आंदोलन करणार

Share

पुणे – हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांनी येत्या रविवारी (ता.६) आंदोलनाची हाक दिली आहे. 

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन हे प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेले नाहीत. याला वाचा फोडण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी येत्या रविवारी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे. आम्ही येत्या रविवारी आंदोलन करण्यावर ठाम आहोत. गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर बैठका होऊन आश्वासने देण्यात आली परंतु, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या रविवारी आंदोलनस्थळी येऊन आमच्याशी चर्चा करून तोडगा जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे, असे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आमदार शंकर मांडेकर यांनी आयोजित केलेली बैठक सकारात्मक झाली. असे असले तरी पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात आणि येरे माझ्या मागल्या होत असल्याची भावना सर्व आयटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसुरे यांनी मांडली.