रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकाऱ्यांसह आवश्यक प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करा; नगरसेविका स्नेहा कलाटे यांची मागणी

रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकाऱ्यांसह आवश्यक प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करा; नगरसेविका स्नेहा कलाटे यांची मागणी
Share

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पूर्णवेळ क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आवश्यक वाहने आणि यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र पिंपळे निलखपासून मामुर्डीपर्यंत विस्तृत असून, त्यामध्ये प्रभाग क्रमांक २६, २५ आणि १६ या तीन प्रभागांचा समावेश होतो. या परिसरात झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची वाढती गरज लक्षात घेता स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी येथील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असून, स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी अद्याप नियुक्त करण्यात आलेले नाहीत, असे स्नेहा कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

स्वतंत्र अधिकारी व पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन, रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे, स्थापत्यविषयक कामे तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणामध्ये दिरंगाई होत आहे. अतिक्रमण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर होत असून, नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही होत आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पूर्णवेळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आरोग्य, स्थापत्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान व स्वच्छता विभागांसाठी स्वतंत्र विभागप्रमुखांसह आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दैनंदिन कामकाज, प्रत्यक्ष स्थळपाहणी, स्वच्छता, कचरा संकलन आणि अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक वाहने व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर क्षेत्रीय कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार न देता रायगड ‘ज’ कार्यालयासाठी पूर्णवेळ कार्यरत ठेवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

Vedh News