पीएमपीएमएल बसची दोघांना धडक, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी, कात्रजमधील घटना
पुणे- रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपीएमएलच्या भरधाव बसने जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सातारा रस्त्यावरील कात्रज चौकात भाजी मंडईसमोर रविवारी(दि.८) पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
निहाल विलास पवार ( २४, रा. संतोषनगर, कात्रज) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे या अपघातात रोहन सुखदेव घोळवे उर्फ साहिल (१८, रा. संतोषनगर, कात्रज) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेजण पहाटे कात्रज चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलची बसने (क्रमांक एमएच १२ एसएफ ७५७४) दोघांना जोरदार धडक दिली.
अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना निहाल पवार याचा मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
