टेम्पोच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू ; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील घटना

शिक्रापूर – रस्त्याच्या कडेने पायी चालत शेताकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव टेम्पोची धडक बसून एका शेतकऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुणे अहिल्यानगर मार्गांवर हा अपघात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला.
नानाभाऊ दामोदर लांडे (वय ५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत गणेश लांडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील टेम्पो चालक संदीप लक्ष्मण शेलार याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानाभाऊ लांडे हे पुणे – अहिल्यानगर रस्त्याच्या कडेने पायी चालत शेताकडे जात असताना पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या व नशेत असलेल्या टेम्पोचालकाने पाठीमागून जोरात धडक दिली.
या धडकेत लांडे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






