शहरात लटकणाऱ्या केबलवर टॅगिंग करा अन्यथा…; पिंपरी-चिंचवड महापालिकेची केबल ऑपरेटर्सना १५ डिसेंबरची डेडलाईन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर लटकणाऱ्या अनधिकृत इंटरनेट, टेलिकॉम आणि टीव्ही केबल्सवर महापालिकेच्या वतीने १६ डिसेंबर २०२६ पासून धडक कारवाई सुरू केली जाणार आहे. तत्पूर्वी केबलवर कंपनीचे नाव, ऑपरेटरचे नाव आणि संपर्क क्रमांक असलेले टॅग लावावेत अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेने दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरांत सुमारे ५०० केबल, इंटरनेट आणि डी टी एच पुरवठादार आहेत. या पुरवठादारांकडून अनधिकृतपणे विजेच्या खांबावरून ओव्हरहेड केबल्स टाकलेल्या आहेत. या केबल्स मुळे शहराच्या सौंदर्याला बाधा होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती. विद्युत खांब, झाडे आणि पुलांवर लटकणाऱ्या केबलमुळे अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी निगडी येथे अशाच एका घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.
शहरांत कोणतीही केबल टाकण्यापूर्वी आकाश चिन्ह विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक असूनही अनेक केबलमालक याकडे दुर्लक्ष करताना आढळून आले आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागात केबलचे जाळे निर्माण झाले आहे. कोणती केबल कोणाच्या मालकीची, कशाची याची माहिती महापालिकेला मिळत नाही.
त्यामुळे महापालिकेने इंटरनेट, टेलिकॉम आणि केबल टीव्ही ऑपरेटर्सना त्यांच्या केबलवर कंपनीचे नाव, ऑपरेटरचे नाव आणि संपर्क क्रमांक असलेले टॅग लावण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
१५ डिसेंबरपर्यंत टॅगिंग न केलेल्या, विनापरवाना टाकलेल्या तसेच वापरात नसलेल्या (खराब) केबल १६ डिसेंबरपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत काढून टाकल्या जातील. कारवाईदरम्यान नागरिकांची इंटरनेट किंवा टीव्ही सेवा खंडित झाल्यास, त्याला सर्वस्वी संबंधित केबल ऑपरेटर जबाबदार राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.







