पोलीस असल्याचे भासवून दांपत्याला लुटले ; अहिल्यानगर मार्गांवर सरदवाडी येथील प्रकार

शिरूर – पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एका विवाहित दाम्पत्याला ५२ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी येथे भरदिवसा घडली आहे.
या घटनेची माहिती अशी की मच्छिंद्र शेंडगे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी शेंडगे (वय ४०) हे दोघे मंगळवार ( दि. २४) रोजी दुचाकीवरून पुण्यातील चंदननगर येथे जात होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सरदवाडी येथील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी या दाम्पत्याला अडवले.
पुढे पोलीस कारवाई सुरू असल्याचे सांगून स्वतः पोलीस असल्याची बतावणी केली आणि अंगावरील सोन्याचे दागिने काढून बॅगेत सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला. त्या दोघांवर विश्वास ठेवून दाम्पत्याने दागिने व पैसे त्यांच्या हाती दिले. भामट्यांनी हातचलाखी करून ४५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि ७ हजार रुपये रोख असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लांबवून पुण्याच्या दिशेने पळ काढला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अश्विनी शेंडगे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







