पिंपरी येथील खुशबू हॉटेलमध्ये तरुणावर कोयत्याने वार, टोळक्याची दहशत

पिंपरी- जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरीतील साई चौक परिसरात बुधवारी (दि. २५) रोजी हॉटेल खुशबूमध्ये घडली.
याप्रकरणी अजय ऊर्फ जीमी उदय सिंग (वय ३४, रा. इंदिरानगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मोनू बहोत (वय अंदाजे २७, रा. कैलासनगर, पिंपरी), अक्षय हजारे (वय अंदाजे २५, रा. पिंपरी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय जेवण करण्यासाठी खुशबू हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी मोनू बहोत आणि अक्षय हजारे त्यांच्यासोबत इतर साथीदार हातात कोयते घेऊन हॉटेलमध्ये आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
यावेळी अक्षय हजारे याने हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. मॅनेजर, वेटर आणि ग्राहक मदतीसाठी जमा झाले असता आरोपींनी त्यांनाही धमकावले.
“आम्ही इथले भाई आहोत, आमच्या भांडणात कोणी पडू नका; मध्ये आलात तर तुम्हालाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी हातातील कोयते फिरवले आणि हॉटेलमध्ये दहशत निर्माण करून घटनास्थळावरून पलायन केले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.







