पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १५ मधील लोकमान्य टिळक रस्त्यावरील ‘सिटी प्राईड’ या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामावर महापालिकेने शुक्रवारी (दि.२७ नोव्हेंबर) निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
सदर अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेच्या वतीने संबंधित बांधकामधारकाला यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटविले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंता सुशीलकुमार लवटे, विटनिरक्षक राहुल निकम आणि सुहास भगत यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईसाठी २० एमएसएफ जवान, ९ मजूर आणि १ जेसीबी ब्रेकरची मदत घेण्यात आली. महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पूर्ण करत सुमारे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड व बांधकाम निष्कासित केले.
थरमॅक्स चौक ते कृष्णानगर येथील अतिक्रमणावर कारवाई
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थरमॅक्स चौक ते कृष्णानगर या पट्ट्यात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान रस्ते व पदपथावरील अडथळे दूर करण्यासाठी विविध दुकानांसमोरील शेड तसेच इतर अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत करणे आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली असून, आगामी काळातही अशा कारवाया सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






