सांगवी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी – सांगवी येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या संविधान शिल्पाचे आजच्या संविधान दिनी लोकार्पण होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारे हे संविधान शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२, सांगवी येथे भारतीय संविधान शिल्पाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून या नूतनीकृत संविधान शिल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या शुभहस्ते आज झाले,त्यावेळी संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी,आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले.
नूतनीकरण झालेल्या संविधान शिल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकीकात भर पडणार असून भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.







