पुणे- शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २६ या कालावधीत मद्यविक्रीवर निर्बंध घालत विविध भागांमध्ये ड्राय डे लागू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. मात्र शहरात 40 पोलीस स्टेशन असताना तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्राय डे आदेश काढले आहेत. म्हणजे एका पावलावर मुबलक दारू तर दुसर्या पावलावर ड्राय डे अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे.
पुणे पोलिसांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा विशेष उल्लेख केला आहे. या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यत या काळात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्री बंदीचे निर्बंध लागू राहणार आहेत. शहरातील इतर पोलीस स्टेशनच्या हद्द अगदी एका पावलावर बदलतात त्यामुळे इतर ठिकाणी ड्रायडे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या अजब निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
काही भागांमध्ये १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान पूर्णपणे मद्यविक्री बंद राहणार आहे, तर काही भागांमध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सवातील पाचवा व सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशी आणि विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध राहणार आहेत. १४ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील. त्यामुळे या दिवशी संबंधित क्षेत्रातील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशीही संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत संबंधित भागात मद्यविक्री बंद राहणार आहे. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील मद्यविक्रीची आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
