जुन्नर- शेतातील कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या शेतकरी दाम्पत्यावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात घडली. सुदैवाने शेतकरी महिलेच्या पाठीला बांधलेल्या फवारणी यंत्रामुळे बिबट्याला थेट हल्ला करता आला नाही.
याबाबतचीमाहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात शेतातील कामासाठी दुचाकीवरून दत्तात्रय शिंदे आणि त्यांची पत्नी विद्या शिंदे दुचाकीवरून जात होते. मेटांगळे शिवारातून जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक झडप घेतली. अनपेक्षित हल्ल्यामुळे दत्तात्रय शिंदे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही खाली पडले. मात्र विद्या शिंदे यांच्या पाठीवर असलेल्या फवारणी पंपामुळे बिबट्याला थेट हल्ला करता आला नाही. फवारणी पंपामुळे बिबट्याची झडप निष्फळ ठरली आणि त्यांचा जीव वाचला. मात्र दुचाकीवरून खाली पडल्यामुळे विद्या शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल गणेश बागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. यावेळी रेस्क्यू टीमचे संतोष कुतळ, रोहित बोडके आणि जयेश भोर उपस्थित होते. बिबट्याच्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
