पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला एफ डी ए चा दणका, हॉटेलचा परवाना निलंबित

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला एफ डी ए चा दणका, हॉटेलचा परवाना निलंबित
Share

पुणे- समस्त पुणेकरांचे सकाळच्या नाश्त्याचे आवडते ठिकाण म्हणजे फेर्ग्युसन कॉलेज रोडवरील हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली. या दोन्ही हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून या दोन्ही हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

एफडीए कडून केलेल्या तपासणीत हॉटेल वैशालीला 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले. स्वयंपाकघराला कीटकप्रतिबंधक दरवाजे नसणे, तापमान नोंदी व पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत चाचणी अहवाल नसणे, तसेच तपासणीवेळी वैध FoSTaC प्रशिक्षित पर्यवेक्षक उपस्थित नसणे या बाबी आढळून आल्या. कच्च्या कापलेल्या भाज्या थेट तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्या होत्या. यापूर्वी जून २०२६ मध्ये तपासणी करून सुधारणा नोटीस दिल्यानंतरही पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

अन्न बनवण्याच्या प्रक्रिया स्वच्छतागृहांजवळ करण्यात यायच्या. कच्चा माल साठवण्याचा फ्रीजर अगदी महिलांच्या स्वच्छतागृहा जवळ होता. डोसा, उत्तप्पा तयार करण्याचा तवाही पुरुषांच्या स्वच्छतागृहा जवळ होता. धुतलेली भांडी सुद्धा स्वच्छतागृहासमोरच्या टेबलावर मांडलेली आढळून आली. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात व इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवलेले आढळले. इडली व डोसा बॅटर तयार करण्याची प्रक्रिया उघड्या असुरक्षित जागेत करण्यात यायची. हे सर्व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन असल्याने ही कारवाई करण्यात आली.

यावेळी रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्न साठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव होता. स्वयंपाकघर उघडे व असुरक्षित असल्याने धूळ, घाण व कीटकांचा प्रवेश होण्याचा धोका निर्माण झाला होता. परिसरात पाणी साचणे, अपुरी साफसफाई आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळून आले. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त व तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे न झाकता तसेच लेबलिंग व ‘Use By’ तारखेशिवाय साठवलेले आढळून आले. कच्चे व तयार अन्न वेगळे न ठेवणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी ठेवलेल्या दिसून आल्या नाहीत.

या सर्व उणिवांमुळे दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. परवाने पूर्ववत होईपर्यंत विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील एफ.सी.रोडवर असलेली ही दोन्ही हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. त्यांना FDA कडून दणका देण्यात आला आहे.

Vedh News