फटाके बाजूला उडवा असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, विमाननगरमधील घटना

पुणे- फटाका अंगावर उडल्याने बाजूला फटाके उडवा, असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी बांबुने मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना विमाननगरमधील रोझ गार्डन सोसायटीसमोर ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली. दरम्यान उपचार सुरु असताना गुरुवारी (दि.१२ ) दुपारी या तरुणाचा मृत्यु झाला.
अमन समीर शेख (वय २२, रा. कलवड वस्ती, लोहगाव रोड, लोहगाव) असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील समीर अब्दुल शेख (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम नागनाथ नवले (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), सम्यक संदीप साळवी (वय १८, रा. चौधरीनगर, टिंगरेनगर), तेजस उमाकांत शिंदे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) आणि आदित्य सिद्धेश्वर गायकवाड (वय १८, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमन व अयान, अरमान शेख व त्याचे काही मित्र हे रोझ गार्डन सोसायटी समोर फटाके वाजवण्यासाठी थांबलेले होते. पुढे थोड्या अंतरावर चार मुले फटाके वाजवत होती. ते फटाके यांच्या अंगावर उडाल्याने अमन शेख याने फटाके जरा बाजुला वाजवा, असे सांगितले. त्यावरून शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तसेच तेथे रस्त्याचे कडेला पडलेल्या लाकडी बांबुने अमन याच्या डोक्यात, पाठीवर, हातावर, तोंडाला मारून गंभीर जखमी केले. इतर जण भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन आरोपी तेथून पळून गेले.
अमन याला मित्रांनी प्रथम सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा ११ जणांवर गुन्हा दाखल केला. अमन शेख याला गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. उपचार सुरु असताना गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी नंतर या गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.






