इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल

इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल
Share

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर १७ फेब्रुवारीला द्वितीय सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावी लेखी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रके मंडळाच्या ‘ www.mahahsscboard.in ‘ या अधिकृत संकेतस्थळावर सहा नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिले आहे. त्यातील बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयाच्या वेळापत्रकामध्ये (सत्रामध्ये) अंशतः बदल केला आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार, अर्थशास्त्राचा पेपर १७ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होणार होता. परंतु हा पेपर त्याचदिवशी दुपारच्या सत्रात ( दुपारी ३ ते ६) होणार आहे. या बदलाव्यतिरिक्त बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल नाही, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही राज्य मंडळाने नमूद केले आहे.

Vedh News