ब्रेकिंग न्यूज

पिंपरी – भाटनगर पुनर्वसित इमारतींचा पुनर्विकास करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भाटनगर (सर्व्हे क्र. १७, पिंपरी) येथील ३३ वर्षांहून अधिक जुन्या, मोडकळीस आलेल्या व धोकादायक पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मार्फत पुनर्विकास करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संदीप वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १९८७ ते १९९१ या कालावधीत भाटनगर येथे तत्कालीन झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी १७ इमारती उभारल्या होत्या. या इमारतींमध्ये आजही शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर या इमारती अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या असून रहिवाशांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

महापालिकेने केलेल्या Structural Audit मध्ये संबंधित इमारती राहण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.

विद्यमान नियमांमध्ये पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्पष्ट तरतूद नसल्याचे सांगत पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाच्या निर्णयाची आवश्यकता असल्याचे संबंधित यंत्रणांनी नमूद केले आहे.

या इमारतींची परिस्थिती आज झोपडपट्टीपेक्षाही अधिक दयनीय झाली असून त्या प्रत्यक्षात ‘Vertical Slum’ मध्ये परिवर्तित झाल्या आहेत. संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक झालेल्या या इमारतींमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या जीविताला कायमस्वरूपी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक घरे उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे.

महापालिकेने या प्रकरणात आवश्यक जुने अभिलेख, कागदपत्रे व सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर SRA मार्फत पुनर्विकास प्रक्रिया राबविता येईल, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईतील सुमारे एक हजार जुन्या पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अशाच धोकादायक पुनर्वसित इमारतींनाही समान न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.