मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ओतूर पोलिसांची कारवाई

मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ओतूर पोलिसांची कारवाई
Share

ओतूर- ओतूर पोलिसांनी दुचाकीचोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे ओतूरसह अकोले, संगमनेर आणि चाकण परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

संदीप गोरक्षनाथ गडख, वैभव विजय वावळे (दोघेही रा. अकोले परिसर, जि. अहिल्यानगर) आणि दीपक कुमा उंबरे (रा. मांडवे, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी अधिक माहिती दिली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान ओतूर येथील चैतन्य विद्यालयासमोरील रस्त्यावरून दत्तात्रय बाळशिराम गिते यांची डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच १४ बीएच ६३६७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना ओतूर पोलिसांच्या पथकाला ब्राह्मणवाडा-ओतूर रस्त्यावर संशयित तीन जण चोरीच्या मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांची तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तपासात संबंधित मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

आरोपीना पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी त्यांचा साथीदार विशाल सुनील ठोंगीरे (रा. मुथाळणे, ता. जुन्नर) याच्या मदतीने आणखी आठ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या मोटारसायकली अकोले, संगमनेर, चाकण आणि ओतूर परिसरातून चोरल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी एकूण नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये डिस्कव्हर, हिरो स्प्लेंडर आणि स्प्लेंडर प्लस या दुचाकींचा समावेश आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Vedh News