मद्यप्राशन करून पोलीस निरीक्षकाकडून तक्रारदाराला मारहाण ; सहकारनगर पोलीस ठाण्यातील प्रकार

पुणे- मद्यप्राशन करून पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला मारहाण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ६) रात्री हा प्रकार घडला. खांदवे यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हे निरीक्षक राजेश खांदवे असे या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री खांदवे हे मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खांदवे यांच्याविरोधात यापूर्वीही वादग्रस्त प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांनी एका न्यायाधीशाला तसेच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात स्वतः तक्रार दिली होती.






