मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे पुण्यात निधन ; कलाविष्कार सादर करतानाच आला हृदयविकाराचा झटका

मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे पुण्यात निधन ; कलाविष्कार सादर करतानाच आला हृदयविकाराचा झटका
Share

पुणे – कर्नाटक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे शुक्रवारी(दि. ६) पुण्यात निधन झाले. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाणेर येथे एका दिवाळी पहाट मैफलीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना स्टेजवरच सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

श्रीधर पार्थसारथी यांच्या पश्चात आई, पत्नी उमा आणि मुलगी स्वीकृती असा परिवार आहे.

श्रीधर पार्थसारथी यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध गुरू विद्वान कारैकुडी आर. चंद्रमौळी यांच्याकडे त्यांनी मृदंगाचे शिक्षण घेतले. प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी डी. के. पट्टम्मळ, विद्वान मदुराई जी. एस. मणी, डॉ. एम. बालमुरलीकृष्ण आणि विद्वान रंगनाथ शर्मा यांसारख्या दिग्गज कलाकारांना मृदंगाची साथ केली.

शास्त्रीय संगीताबरोबरच विविध संगीतप्रकारांतील प्रयोगांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. हरहुन्नरी गायक शंकर महादेवन, संजीव अभ्यंकर, रतनमोहन शर्मा आणि नंदकिशोर मुळे यांच्यासोबत त्यांनी जुगलबंदी सादर केली होती. नामवंत संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले.

प्रसिद्ध संगीत निर्माते बॉब बेल्डन यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘माइल्स फ्रॉम इंडिया’ या अल्बममध्येही त्यांचे योगदान होते. तालावरील विलक्षण प्रभुत्व, प्रयोगशीलता आणि विविध संगीतपरंपरांशी जुळवून घेण्याची क्षमता यांमुळे त्यांनी भारतीय तालवादन क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.

शंकर महादेवन यांनी श्रीधर पार्थसारथी यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरुन शोक व्यक्त केला आहे. “हे पचवणेच अशक्य आहे! माझ्यासाठी आणि संपूर्ण संगीत विश्वासाठी ही एक मोठी हानी आहे!आमचे अत्यंत लाडके श्रीधर पार्थसारथी – जे सर्वोत्तम मृदंगवादकांपैकी एक आणि एक विलक्षण संगीतकार होते – त्यांच्या जाण्याने आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत!”

Vedh News