सिमकार्डच्या कव्हरमुळे कचऱ्यात सापडलेल्या ‘त्या’ दोन पायांचे शरीर मिळाले ! हत्येचा झाला उलगडा
पिंपरी- पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यात एका पोत्यामध्ये पुरुषाचे गुडघ्यापासून वेगळे केलेले दोन पाय आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. दोन तरुण कचरा गोळा करण्यासाठी आले असताना हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. परिसराची पाहणी केली. श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. ज्या पोत्यात हे पाय ठेण्यात आले होते त्या पोत्याची बारकाईने पाहणी केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा होऊन हे दोन पाय कुणाचे आहेत आणि संबंधित व्यक्तीची हत्या कोणी केली याचा उलगडा करण्यात सांगवी पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे.
विष्णू तानाजी कुंभार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, अनिल खाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात हा प्रकार उघडकीस आला. काल शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना एका पोत्यावर रक्ताचे डाग दिसले. सुरुवातीला पोत्यात श्वानाचे पाय असल्याचा त्यांना संशय आला. मात्र, पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये मानवी पाय असल्याचं समोर आलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस तसेच पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक आयुक्त मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह क्राईम ब्रँच पथक घटनास्थळी दाखल झाले. ज्या पोत्यात मानवी पाय ठेवण्यात आले होते, त्या पोत्याची बारकाईने तपासणी केली असता त्यामध्ये सिमकार्डचे कव्हर आणि सिमकार्ड आढळले. या कव्हरवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी सिमकार्ड मोबाइलमध्ये टाकून त्यातील एका क्रमांकावर फोन केला असता हे सिमकार्ड आदिल खाडे याचे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी आदिल खाडे याचा शोध घेण्यास सुरुवात केली.त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतल्यानंतर त्यांना ते दोन पाय दाखवण्यात आले. मात्र हे पाय त्यांना ओळखता आले नाहीत. आदिल हा गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत राहत नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आदींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आदिलच्या मुलाच्या मोबाइलमध्ये आदींचा फोटो मिळाला. या फोटोत आदिल दारू पिऊन पडलेल्या अवस्थेत होता. या फोटोतील पाय आणि सापडलेले पाय याची तुलना करून पहिली असता ८० टक्के साम्य दिसून आले. परंतु त्यावरून हे पाय आदिल याचे आहेत असा निष्कर्ष काढता येऊ शकत नव्हता.
पोलिसांनी आदिलच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आदिल हा पिंट्या उर्फ विष्णू कुंभार यांच्याकडे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कुंभार याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या घराजवळ पोलिसांचे पथक गेले असता त्याठिकाणी परिसरात प्रचंड दुर्गंधी येत होती. विष्णू कुंभार याच्या घराला कुलूप असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्याठिकाणी आदिल खाडे याचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार हे दोघे मित्र होते. रात्री दोघांनी एकत्र दारू प्यायली होती. यावेळी त्यांच्यात वाद झाला. याच वादातून विष्णू कुंभार याने अनिल खाडे याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर कोयत्याने गुडघ्यापासून दोन्ही पाय वेगळे केले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहाचे विभक्त केलेले दोन्ही पाय पोत्यात भरले आणि रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात फेकून दिले.
