कोथरूड हादरले! सराईत गुंड लाल्या शेठची तलवारीने वार करून हत्या

पुणे – पुण्याच्या कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात प्रकाश उर्फ लाल्या शांताराम येवले (लाल्या शेठ, वय २७) या सराईत गुन्हेगाराची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे.
प्रकाश उर्फ लाल्या शांताराम येवले (वय २७, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तीन ते चार जणांनी लाल्याच्या मानेवर तलवारीने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला. काही तासातच पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करून इतर आरोपींची नावे आणि हल्ल्याचे कारण तपासण्यात येईल. जुन्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, लाल्या हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.






