महावितरणचे डीपी फोडून ६० किलो वजनाच्या तांब्याच्या तारांची चोरी ; दौंड तालुक्यातील घटना

दौंड- तालुक्यातील पिलाणवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी महावितरणचे विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यातील ६० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच चोरट्यानी डी पी मधील ऑईल सांडून नुकसान केले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी राम भरत फड (वय २८ रा. राहू तालुका दौंड ) यांनी फिर्याद दिली आहे. फड हे महावितरणचे वायरमन म्हणून काम करतात. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिलाणवाडी येथील शेतकरी विकास बाळू डुबे यांनी कानडी परिसरातील डी पी जमिनीवर पडल्याची माहिती फड यांना दिली.
फड यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता २२/६३ के व्ही क्षमतेचा डीपी पडलेले आढळले. त्याचे झाकण बाजूला पडून आतील ऑईल बाहेर सांडलेले होते. डीपी मधील अंदाजे ६० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे निदर्शनास आले. फड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसह घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करत आहेत.






