सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था

पुणे – दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी स्थानक परिसरातील पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा, विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळांची माहिती देणारे फलक आणि मार्गदर्शनासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात पुणे रेल्वेस्थानकावरून उत्तर भारतासह विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडण्याचा धोका असतो. दरम्यान, प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वी विनाकारण प्लॅटफॉर्मवर गर्दी करू नये. स्थानक परिसरात उभारलेल्या स्वतंत्र मंडपाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने यंदा स्वतंत्र मंडपाची व्यवस्था केली आहे. या मंडपात प्रवाशांना बसण्यासाठी आणि प्रतीक्षा करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रकाशासाठी दिवे, पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रसाधनगृहांची सुविधाही देण्यात आली आहे. दिवाळी विशेष गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांची माहिती प्रवाशांना सहज मिळावी, यासाठी माहिती दर्शक फलक लावण्यात आले आहेत. प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी स्थानक परिसरातील पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात प्रवाशांसाठी दिवे, पंखे, पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अतिरिक्त जवानांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन, प्रवाशांना मार्गदर्शन आणि स्थानक परिसरातील सुरक्षितता यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.






