भरधाव ‘थार’ने वाहतूक पोलिसालाच बॉनेटवर उचलून नेले ; बारामतीमधील थरारक घटना

भरधाव ‘थार’ने वाहतूक पोलिसालाच बॉनेटवर उचलून नेले ; बारामतीमधील थरारक घटना
Share

बारामती – काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एक महिंद्रा थारचा फोटो काढून कारवाई करण्यासाठी पुढे आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यालाच चालकाने बॉनेटवर उचलून घेतले. या पोलिसाला सुमारे ५० फूट फरफटत नेल्याची धक्कादायक घटना बारामतीतील सम्यक चौकात घडली. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले जखमी झाले आहेत. तर, ‘थार’चालक वाहनासह पसार झाला.

याघटनेची माहिती अशी की, बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास दत्तात्रेय भोसले सम्यक चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे एक थार आली. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या महिंद्रा थारला (एमएच ५३ ए ४४००) त्यांनी थांबण्याचा इशारा केला. भोसले ई-चलन मशीनद्वारे वाहनाचा फोटो काढत असताना चालकाने अचानक वेग वाढवून जीप थेट त्यांच्या अंगावर घातली. धडकेत ते बोनेटवर फेकले गेले. मात्र हे पाहूनही न थांबता चालकाने त्यांना ४० ते ५० फूट फरफटत नेले. काही अंतरावर तोल जाऊन भोसले रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.

या घटनेनंतर चालक थारसह घटनास्थळावरून पसार झाला. दत्तात्रेय भोसले यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनमालकाशी संपर्क साधल्यानंतर घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धीरज शेडगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, वाहतूक पोलिसासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Vedh News