पुण्यात ॲमेझॉन, बिग बास्केट गोदामांचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई

पुणे – अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ने आता आपली नजर अन्नपदार्थांचा साठा आणि पुरवठा करणाऱ्या गोदामांकडे वळवली आहे. मुदत संपलेले खाद्यपदार्थ, बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ साठवणूक आढळल्याने नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) येथील ‘ॲमेझॉन’ आणि ‘बिग बास्केट’च्या गोदामांचे (डार्क स्टोअर) अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
‘ॲमेझॉन’च्या (गजानन इन्व्हेंटरीज) गोदामात लाडू, पेढे यांसह मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळले. मुदत संपलेल्या काही पदार्थांमध्ये बुरशी झाली होती. खाद्यपदार्थांच्या डब्यांमध्ये धूळ, तुपाच्या डब्याचे तुटलेले झाकण आणि तेलाच्या डब्यांमधून गळती होत असल्याचेही दिसले. साबण आणि खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
‘बिग बास्केट’च्या (इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट) गोदामात केक, पाव, चटणी आणि दुधापासून बनवलेले पदार्थ या प्रकारची मुदत संपलेली उत्पादने आढळली. कोल्ड रूममधील फरशी अस्वच्छ आणि तुटलेली होती. खाद्यपदार्थ जमिनीवर ठेवण्यात आले होते. तेलाच्या पाकिटांमधून गळती होत होती. बॉम्बे पावच्या पाकिटावर उत्पादनाची आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद नसल्याचे आढळून आले.
पुणे स्टेशन येथील ‘मेट्रो रेस्टॉरंट’ आणि ‘शिवाय कॉर्नर’, ईस्ट स्ट्रीटवरील ‘सहाना व्हेज रेस्टॉरंट’, कॅम्पमधील ‘ग्रँड दिल्ली दरबार’, बाबाजान चौकातील ‘राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार’, एम. जी. रस्ता येथील ‘द बर्गर बार्न कॅफे’, हडपसरमधील ‘महादेव फूड्स’ आणि कोंढवा खुर्दमधील ‘फिरोज केटरर्स’ या आठ हॉटेलांचे परवाने ‘एफडीए’कडून निलंबित करण्यात आले.
हॉटेलच्या स्वयंपाकघरातील अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आणि खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केल्याचे आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. या कारवाईत
पुणे स्टेशन, कॅम्प, एम. जी. रोड, हडपसर आणि कोंढवा परिसरातील २० हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आठ ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे आढळले.
ही कारवाई सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांनी तपासणी केली.







